रशियाचे युक्रेनवर ड्रोन हल्ले   

पुतिन यांच्या भूमिकेवर ट्रम्प यांना शंका 

कीव्ह : रशियाने शनिवारी रात्री युक्रेनमध्ये व्यापक ड्रोन हल्ले सुरू करत अनेक भागांना लक्ष्य केले आहे, अशी माहिती रविवारी अधिकार्‍यांनी दिली. या हल्ल्यांच्या एक दिवस आधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या युद्ध संपवण्याच्या इराद्यावर शंका व्यक्त केली होती.
 
निप्रॉपेट्रोव्स्कचे गव्हर्नर सेर्ही लिसाक यांनी सांगितले, की या प्रदेशातील पावलोहराड शहरात सलग तिसर्‍या रात्री झालेल्या हल्ल्यात एक जण ठार तर  एक १४ वर्षीय मुलगी जखमी झाली आहे. रशियाने कुर्स्क प्रदेशाच्या उर्वरित भागावर पुन्हा ताबा मिळवल्याचा दावा केल्यानंतर काही तासांतच हे हल्ले करण्यात आले.

हल्ल्यांसाठी १४९ ड्रोनचा वापर 

युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले, की रशियाने या हल्ल्यांसाठी १४९ ड्रोनचा वापर केला, त्यापैकी ५७ नष्ट करण्यात आले. स्थानिक अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रोन हल्ल्यात ओडेसा प्रदेश आणि झिटोमिर शहरात प्रत्येकी एक जण जखमी झाला आहे.
 
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी सांगितले, की त्यांनी ब्रायन्स्कच्या सीमावर्ती भागात पाच युक्रेनियन ड्रोन नष्ट केले आहेत; तसेच क्रिमियन द्वीपकल्पात तीन युक्रेनियन ड्रोन देखील नष्ट करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 

Related Articles